फलटण प्रतिनिधी :
नृत्यकलेच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत फलटणच्या दोन गुणवंत कन्यांनी शहराच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला आहे. भक्ती किरणकुमार नाळे आणि अंकिता नितीन गांधी यांनी आपल्या उत्कृष्ट नृत्यकौशल्याच्या जोरावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकासह प्रतिष्ठेचा Global Excellence Award पटकावला आहे.
निष्णात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. किरणकुमार नाळे व प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजश्री नाळे यांची १५ वर्षीय कन्या भक्ती नाळे, तसेच शांतिकाका सराफ अँड सन्सचे व्यावसायिक श्री. नितीन शांतिलाल गांधी यांची कन्या अंकिता गांधी यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केले.
मे २०२६ मध्ये पुणे येथे आयोजित ABSS राष्ट्रीय स्पर्धेत, तसेच नोव्हेंबर २०२६ मध्ये अंदमान-निकोबार येथे आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत Open Ethnic या नृत्यप्रकारात दोघींनीही प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या या कलाविष्काराला सुवर्णपदक आणि Global Excellence Award देऊन गौरविण्यात आले.
या नृत्यसादरीकरणाचे नृत्यदिग्दर्शन अंकिता गांधी यांनी केले होते. त्यांच्या कल्पक नृत्यरचनेला आणि भक्ती नाळे व अंकिता गांधी यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाला परीक्षकांकडून गौरव प्राप्त झाला. विशेष म्हणजे, या यशातून फलटणमधील नृत्यकलेची गुणवत्ता आणि नव्या पिढीतील कलागुणांची चमक अधोरेखित झाली आहे.
अंकिता नितीन गांधी या फलटण येथील The Star Dance Studio च्या संस्थापक आहेत. त्या श्यामक डावर अकॅडमीमधून प्रशिक्षित असून प्रमाणित बेली डान्सर व झुंबा प्रशिक्षक आहेत. बॉलीवूड, सेमी-क्लासिकल आणि लोकनृत्य अशा विविध नृत्यप्रकारांमध्ये त्यांना आठ वर्षांहून अधिक काळाचा प्रशिक्षण व नृत्यदिग्दर्शनाचा अनुभव आहे.
अखिल भारतीय सांस्कृतिक संघ (ABSS) ही २००५ पासून कार्यरत असलेली भारतीय सांस्कृतिक संस्था आहे. ऑगस्ट २०१७ पासून या संस्थेला UNESCO चा अधिकृत सल्लागार भागीदारीचा (Consultative Status) दर्जा प्राप्त झाला आहे. संस्थेमार्फत २०१० पासून Global Cultural Olympiad of Performing Arts हा आंतरराष्ट्रीय उपक्रम राबविला जात असून नृत्य, संगीत, नाट्य व इतर कलांच्या माध्यमातून कलाकारांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.
भक्ती नाळे आणि अंकिता गांधी यांच्या या यशामुळे फलटणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या दोन्ही गुणवंत कन्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांच्या आगामी कलाप्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


















