पुणे प्रतिनिधी -
चांगल्या पगाराची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून नोकरीसाठी उमेदवारांकडून पैसे घेऊन फसवणूक केल्याची तक्रार एका महिलेने पोलिसांत दाखल केली आहे. या प्रकरणात एकूण ७७ लाख ७१ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदार अर्चना शिवाजी इंदलकर (वय ३९) यांनी १२ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या जबाबानुसार, त्या सॉफ्टवेअर क्षेत्रात नोकरीच्या शोधात असताना त्यांच्या मैत्रिणीमार्फत एस.एस. इन्फोटेक कन्सल्टन्सीशी संपर्क झाला. यावेळी सागर शेलार व मानसी शेलार यांनी पुण्यातील कंपनीत वरिष्ठ सॉफ्टवेअर पदावर नोकरी आणि चांगले पॅकेज देण्याचे सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीनुसार, सुमारे ९ लाख रुपयांचे पॅकेज देण्याचे सांगून त्याच्या ३० टक्के रकमेची आगाऊ मागणी करण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराकडून विविध कारणांनी रक्कम घेण्यात आली. नोकरीसाठी कंपनीत रुजू झाल्यानंतरही वेतन न मिळाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
पुढे कंपनीकडून पगार देण्याच्या विविध तारखा सांगण्यात आल्या. मात्र पगार न मिळाल्याने तक्रारदाराने संबंधितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कंपनीचा व्हॉट्सॲप ग्रुप बंद करण्यात आला तसेच संबंधितांचे फोन बंद झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणात तेजश्री खताळ, सागर शेलार, मानसी शेलार, प्रसन्न आंबेकर, अंकुश वानखेडे ऊर्फ आशिष रहाटे यांच्यासह संबंधित व्यक्तींविरोधात फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. तक्रारीनुसार, याच पद्धतीने कंपनीतील सुमारे ४० जणांची फसवणूक झाल्याचे समोर आल्याचे नमूद आहे.
तक्रारीसोबत नमूद केलेल्या माहितीनुसार, विविध व्यक्तींकडून ७५ हजारांपासून २ लाख रुपयांपर्यंतच्या रकमा घेण्यात आल्याचा उल्लेख आहे. संबंधित मालमत्तेची/फसवणुकीची एकूण रक्कम ७७,७१,५०० रुपये असल्याचे FIR मध्ये नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून चौकशी होणार असून, संबंधित व्यक्ती दोषी आहेत की नाही हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

















