फलटण प्रतिनिधी :
भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये फलटण तालुक्यात आपले राजकीय वर्चस्व निर्माण केल्याचे दिसून आले आहे. मात्र, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही इतर निवडणुकांपेक्षा वेगळी आणि अधिक आव्हानात्मक मानली जाते. अशा निवडणुकीत मतदारांचे संख्याबळ अनुकूल नसतानाही रणजितदादांनी घेतलेली आघाडी आणि उभी केलेली लढत पाहता आता त्यांच्या राजकीय कौशल्याचे कौतुक विरोधकांकडूनही होताना दिसत आहे. 'दादांना मानलं पाहिजे' अशा शब्दांत विरोधकांनी त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीची वाहवा केली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील फलटण तालुका सोसायटी मतदारसंघात एकूण १३2 मतदार आहेत. या मतदारसंघात अवघ्या २९ मतदारांचे पाठबळ असतानाही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपले मोठे बंधू तथा फलटण नगरपालिकेचे विद्यमान लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.
गेल्या ३२ वर्षांहून अधिक काळ या मतदारसंघात प्राबल्य असलेल्या श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याविरोधात निवडणूक लढवणे हे मोठे आव्हान होते. मात्र, रणजितदादांनी केलेल्या राजकीय व्यूहरचनेमुळे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी तब्बल ६० मते मिळवत प्रतिस्पर्ध्याला जोरदार टक्कर दिली. अखेर अवघ्या ११ मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
या निवडणुकीत विजय मिळवता आला नसला तरी मर्यादित मतदारसंख्येचे पाठबळ असताना प्रस्थापित राजकीय ताकदीसमोर दिलेली ही लढत विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. जिल्हा बँकेची निवडणूक सहसा स्थानिक राजकीय वर्तुळापुरती मर्यादित राहते; मात्र यावेळी फलटणच्या राजकारणात या निवडणुकीने मोठी उत्सुकता निर्माण केली.
विशेष म्हणजे, रणजितदादांच्या राजकीय रणनीतीची चर्चा केवळ समर्थकांमध्येच नव्हे, तर विरोधकांमध्येही होत आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून विरोधकांकडूनही त्यांच्या निवडणूक व्यवस्थापनाचे कौतुक होत असल्याने फलटणच्या राजकारणात या निवडणुकीची वेगळीच चर्चा रंगली आहे.
निवडणुकीत विजय-पराभव होतच असतात; मात्र प्रतिकूल परिस्थितीतही प्रतिस्पर्ध्याला कडवी टक्कर देण्याची क्षमता दाखवणे हीच राजकीय ताकद असते, अशी चर्चा आता फलटणच्या राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.

















