फलटण प्रतिनिधी :
खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी ₹३ हजारांची लाच स्वीकारताना पुसेगाव, ता. खटाव येथील मंडळाधिकारी किशोर नंदू खटावकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदाराने मौजे घाडबदरे (काटगुण), ता. खटाव येथील जमीन खरेदी केली होती. या खरेदी दस्ताची नोंद प्रमाणित करून मंजूर करण्यासाठी मंडळाधिकारी किशोर खटावकर यांनी तक्रारदाराकडे ₹३ हजार लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ५ ऑक्टोबर २०२६ रोजी पुसेगाव येथे सापळा रचण्यात आला. यावेळी ₹३ हजारांची लाच स्वीकारताना खटावकर यांना पकडण्यात आले.
या कारवाईत सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील दाजी पाटील आणि पर्यवेक्षक अधिकारी पोलीस उपअधीक्षक शैला कोरडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी सहभाग घेतला.
सापळा पथकात पोलीस हवालदार नितीन गोगावले, पोलीस हवालदार निलेश राजपूरे, पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल सत्यम थोरात आणि पो.हे.कॉ. अजित कर्णे यांचा समावेश होता.
या कारवाईस पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्र यांचे मार्गदर्शन लाभले.
या प्रकरणी पुसेगाव पोलीस ठाणे, जि. सातारा येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
















