फलटण प्रतिनिधी :
फलटण येथील न्यायालय परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सापळा रचून मोठी कारवाई केली. एका तक्रारदाराकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी वकिलाला रंगेहात पकडण्यात आले असून, या प्रकरणात पॅनेल विधिज्ञालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या प्रकरणातील तक्रारदार पुरुष असून त्यांच्याविरुद्ध लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचे दोषारोपपत्र फलटण न्यायालयात दाखल झाले होते. तक्रारदाराची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे फलटण तालुका विधी सेवा समितीकडून नितीन विलासराव भोईटे (वय ४५) यांची पॅनेल विधिज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
तक्रारदाराच्या न्यायालयीन कामकाजात मदत करण्यासाठी न्यायालयातील कामकाजाशी संबंधित व्यक्तीच्या माध्यमातून ४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी होत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर ५ नोव्हेंबर रोजी फलटण येथील जेएमएफसी न्यायालयाच्या इमारतीमध्ये सापळा कारवाई करण्यात आली.
यावेळी खासगी वकील अजिम सलीम मेटकरी (वय ३४, रा. गोळीबार मैदान, फलटण) यांनी पॅनेल विधिज्ञ नितीन भोईटे यांच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. त्यानंतर पॅनेल विधिज्ञ नितीन भोईटे यांनाही ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७, ७अ व १२ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक शैला कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये पोलीस हवालदार नितीन गोगावले, पोलीस हवालदार निलेश राजपुरे, पोलीस हवालदार गणेश ताटे व पोलीस हवालदार चालक अजित कुंभार यांनी सहभाग घेतला.
भ्रष्टाचारासंबंधी कोणतीही माहिती अथवा लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


















