फलटण : भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुका शाखेच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेचा सांगता समारोह रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी कोळकी येथील बुद्धविहारात मंगलमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. तालुका शाखेने वर्षावास काळात ५६ गावांमध्ये ३२ विषयांवर प्रवचनांचे नियोजन करून ही मालिका यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी शाखेच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमानिमित्त कोळकी बुद्धविहार परिसर आकर्षक रांगोळीने सजविण्यात आला होता. सकाळी १० वाजता उपासक, उपासिका आणि समता सैनिकांच्या उपस्थितीत पंचरंगी धम्मध्वजाला सलामी देऊन ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून सामूहिक त्रिसरण, पंचशील, बुद्धपूजा, भीमस्तुती, भीमस्मरण आणि स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
तालुका अध्यक्ष भीमराव लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष नानासो मोहिते यांच्यासह जिल्हा व तालुका शाखेचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. वर्षावास काळातील उपक्रमांचा आढावा घेताना राजकुमार रणवरे यांनी ५६ गावांमध्ये ३२ विषयांवर प्रवचनांचे नियोजन, प्रवचनकारांची निवड आणि संपूर्ण मालिकेच्या यशस्वी अंमलबजावणीची माहिती दिली.
माजी प्राचार्य सावंत सर यांनी यंदाच्या वर्षावास काळात आतापर्यंतच्या वर्षावासांच्या तुलनेत सर्वाधिक प्रवचने झाल्याचे सांगून नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. अरुण गायकवाड यांनी सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन केलेल्या कार्याचे कौतुक केले. महिला जिल्हाध्यक्ष सुजाता गायकवाड आणि महिला तालुकाध्यक्षा रंजना मॅडम यांनीही तालुका कार्यकारिणीच्या कामगिरीचे अभिनंदन केले.
माजी जिल्हाध्यक्ष श्रीमंत घोरपडे सर यांनी ग्रामशाखांच्या नियोजनासह आगामी काळातील कार्याची दिशा स्पष्ट केली. संस्कार विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष सोमिनाथ घोरपडे यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविणाऱ्या भावना व्यक्त केल्या. जिल्हाध्यक्ष नानासो मोहिते यांनी वर्षावास काळात घेण्यात आलेल्या परिश्रमांचा आढावा घेतला. तसेच ‘मिशन २५’ अंतर्गत निश्चित केलेले उद्दिष्ट तालुका शाखा लवकरच पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात तालुकाध्यक्ष भीमराव लोंढे यांनी तालुका शाखेच्या सर्व सदस्यांच्या योगदानामुळे ५६ गावांमध्ये प्रवचन मालिका आणि ग्रामशाखांच्या माध्यमातून यशस्वी काम करता आल्याचे सांगितले. केशव ठोंबरे, राजकुमार रणवरे, अरविंद निकाळजे, श्रीनिवास धाईंजे, प्रदीप जगताप, चंद्रकांत मोहिते, भिकू भोसले, अर्जुन ननावरे, प्रभुदास मेश्राम, विजय लोंढे, शं. ज्ञा. कांबळे, राजेंद्र अहिवळे, सुनील मोहिते, सुनील कांबळे, धीरज मोरे, अनिकेत कांबळे, संपत माने, राजेंद्र गायकवाड, संजय भोसले, सचिन मोहिते, सचिन रोकडे तसेच माजी संघटक आणि महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी दिलेल्या योगदानाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
आगामी काळात संस्थेची सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमानंतर अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले. सचिन मोहिते यांनी आभार मानले, तर सरचिटणीस केशव ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले. सामूहिक सरणतयाने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी शरद मोरे (पिंपरद), यशवंत काकडे (झिरपवाडी) आणि अविनाश जगताप यांच्यासह विविध ग्रामशाखांच्या सदस्यांनी मनोगते व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
एकूणच, ५६ गावांमध्ये राबविण्यात आलेली वर्षावास प्रवचन मालिका आणि सांगता समारोहाच्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका शाखेच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला आणि आगामी उपक्रमांसाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळाले.















