फलटण प्रतिनिधी :
सांगली बार असोसिएशनतर्फे वकील आणि न्यायाधीशांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘दुसऱ्या राज्यस्तरीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २०२६’ मध्ये फलटण आणि सातारा वकील संघाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेतील एकत्रित यशाच्या जोरावर सातारा जिल्ह्याने गुणतालिकेत प्रथम क्रमांक पटकावला.
सांगली येथे पार पडलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील २२ हून अधिक जिल्ह्यांतील १०० पेक्षा जास्त वकिलांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती मा. श्री. अभय एम. थिपसे उपस्थित होते. राज्यातील विविध जिल्ह्यांतील वकील खेळाडूंमध्ये झालेल्या या स्पर्धेत फलटण आणि सातारा वकील संघाच्या खेळाडूंनी बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि संयमाच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी केली.
या स्पर्धेत फलटण येथील सरकारी वकील ॲड. पंकज महाले यांनी नववा क्रमांक मिळवत टॉप १० मध्ये स्थान मिळवले. ॲड. सुरेंद्र सरतापे यांनी टॉप २० मध्ये, तर ॲड. सागर सस्ते, ॲड. रणजित जाधव आणि ॲड. गौरव गोसावी यांनी टॉप ३० मध्ये स्थान मिळवले. तसेच ॲड. प्रसाद खिरे आणि ॲड. शाम अहिवळे यांनी टॉप ५० मध्ये स्थान मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.
या यशाबद्दल फलटण वकील संघातर्फे सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ॲड. सुजाता माने, ॲड. वीरसेन कदम, ॲड. राहुल कर्णे आणि ॲड. सुनील शिंदे यांच्या हस्ते यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी ॲड. सागर सस्ते, ॲड. रणजित जाधव, ॲड. सुरेंद्र सरतापे, ॲड. गौरव गोसावी, ॲड. प्रसाद खिरे, ॲड. शाम अहिवळे आणि सरकारी वकील ॲड. पंकज महाले यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन वकील संघाच्या उपाध्यक्ष ॲड. मेघा अहिवळे, सहसचिव ॲड. शारदा दीक्षित आणि सदस्य ॲड. रोहिणी भंडलकर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वकील संघाच्या उपाध्यक्ष ॲड. मेघा अहिवळे यांनी केले, तर अध्यक्ष ॲड. उमेश कदम यांनी आभार मानले. यावेळी वकील संघातील सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
राज्यस्तरीय स्पर्धेत मिळवलेले हे यश फलटण वकील संघासाठी अभिमानास्पद असून, सातारा जिल्ह्याला गुणतालिकेत प्रथम क्रमांक मिळवून देणाऱ्या सर्व खेळाडूंचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.


















