फलटण प्रतिनिधी :
फलटण शहर पोलीस स्टेशनच्या अगदी समोर असलेल्या विमानतळ परिसरात काही दुचाकीस्वारांकडून खुलेआम स्टंटबाजी आणि हुल्लडबाजी सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. विविध प्रकारच्या दुचाकींवरून वेगाने गाड्या चालवणे, मोठमोठे आवाज करणे, आकर्षक लाईट्सचा वापर करणे तसेच धोकादायक स्टंट करणे यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
विमानतळ परिसरात दररोज सायंकाळच्या वेळेस फलटणमधील अनेक नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण फिरण्यासाठी तसेच वॉकिंगसाठी येत असतात. मात्र, काही युवकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्टंटबाजी करताना दुचाकीस्वारांकडून वेगवेगळे धोकादायक प्रकार केले जात असल्याने पादचारी आणि इतर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, या प्रकारांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांना जीव मुठीत धरून फिरावे लागत आहे. एखाद्या वेळी दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फलटण शहर पोलीस स्टेशनच्या अगदी समोरच हा प्रकार सुरू असताना संबंधित पोलिस प्रशासनाचे याकडे लक्ष आहे का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
त्यामुळे फलटण शहर पोलिसांनी विमानतळ परिसरात नियमित गस्त वाढवावी, स्टंटबाजी करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी फलटणकर नागरिकांकडून होत आहे.

















