फलटण प्रतिनिधी :
ग्रामीण भागात सातत्याने व्याख्यानमाला आयोजित करणे ही उल्लेखनीय बाब असून, दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे सामाजिक उपक्रम प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी केले. दुधेबावी (ता. फलटण) येथील ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दुधेबावी फेस्टिव्हल अंतर्गत संत गाडगेबाबा व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंडल वन प्रबोधिनी, सांगलीचे प्रशासक व व्यवस्थापक हरिश्चंद्र वाघमोडे होते.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हणमंतराव सोनवलकर, पंचायत समिती सदस्या विजयाताई सोनवलकर, ग्रामपंचायतीच्या सरपंच भावनाताई सोनवलकर, ज्येष्ठ पत्रकार प्रा. पोपटराव मिंड, सामाजिक कार्यकर्ते संपतराव नाळे, सोसायटीचे चेअरमन सचिन सोनवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेले सोहम नामदेव शेंडे, मंडल कृषी अधिकारीपदी निवड झालेल्या प्राजक्ता अनिल नाळे आणि राज्यकर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया संपत आडके यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
न्यायमूर्ती पानसरे पुढे म्हणाले की, जिद्द, चिकाटी आणि परिश्रम यांच्या जोरावर यश मिळवणे कठीण नाही. द्वेष, मत्सर आणि तिरस्काराला हद्दपार करून प्रत्येकाने स्वतःची प्रगती साधली पाहिजे. गेल्या २६ वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या या व्याख्यानमालेमुळे गावातील युवकांना एमपीएससी आणि यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा मिळत आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थीही यशाची शिखरे गाठत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कुंडल वन प्रबोधिनीचे प्रशासक व व्यवस्थापक हरिश्चंद्र वाघमोडे म्हणाले की, प्रबोधनातून सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडते. आर्थिक प्रगतीबरोबरच वैचारिक प्रगती होणेही तितकेच आवश्यक आहे. धनसंपत्तीपेक्षा ज्ञानसंपत्तीला अधिक महत्त्व असून, संत गाडगेबाबा व्याख्यानमालेचे सातत्य अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे.
पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हणमंतराव सोनवलकर यांनी दुधेबावी प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवकांना सातत्याने दिशा दिली जात असल्याचे सांगितले. गावातील युवक अधिकारी होण्यामागे प्रतिष्ठानचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेले सोहम शेंडे यांनी सातत्यपूर्ण अध्ययन, प्रचंड इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास कोणतेही ध्येय अशक्य नसल्याचे सांगितले.
उद्योजक राजेंद्र नाळे यांनी ग्रामीण भागात उद्योग उभा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला; मात्र आम्ही बंधूंनी जिद्दीने ग्रामीण भागात उद्योग उभारला, याचा अभिमान वाटतो. या उद्योगाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देता आल्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी केले. प्रास्ताविक व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष डॉ. सागर कराडे यांनी केले. सूत्रसंचालन उपाध्यक्ष विजयकुमार नाळे व खजिनदार डॉ. युवराज एकळ यांनी केले, तर आभार सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष सचिन सोनवलकर यांनी मानले.
यावेळी फलटण तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष धनंजय सोनवलकर, माजी उपसरपंच अविनाश चांगण, सर्जेराव सोनवलकर, उद्योजक राजेंद्र नाळे, किरण नाळे, वृक्षमित्र सचिन सोनवलकर, संदीप ठोंबरे, सौरभ एकळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















