फलटण | धैर्य टाईम्स |
श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, साखरवाडी ता फलटण साखर कारखान्याने सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसाच्या उर्वरित बिलापोटी प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे एकूण १५ कोटी ७९ लाख ६७ हजार ५८९ रुपयांची रक्कम ११ हजार ७८५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कारखाना व्यवस्थापनाने घेतलेल्या या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे.
श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने २२ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित शेतकरी मेळाव्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली होती. यामध्ये उसाच्या लागवडीचे नियोजन, उसाच्या विविध जाती, ऊस उत्पादन व टनेज वाढविण्याचे उपाय तसेच कारखान्याचे लागवड धोरण या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. याच मेळाव्यात सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसाच्या बिलापोटी प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे रक्कम दसऱ्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याबाबत व्यवस्थापनाने चर्चा केली होती. त्यानुसार कारखाना व्यवस्थापनाने दिलेल्या शब्दाची पूर्तता करत २८ ऑक्टोबर २०२६ रोजी ११ हजार ७८५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर एकूण १५ कोटी ७९ लाख ६७ हजार ५८९ रुपयांची रक्कम वर्ग केली. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक मदत मिळाली आहे.याबाबत कारखान्याचे मुख्य प्रशासनाधिकारी अजितराव जगताप यांनी माहिती दिली. शेतकरी हा साखर कारखानदारीचा महत्त्वाचा घटक असून, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत व्यवस्थापनाने ही रक्कम वर्ग केल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित शेतकरी बांधवांनी आपल्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम तपासून घ्यावी व आवश्यकतेनुसार बँकेतून रक्कम काढून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
या वेळी कारखान्याचे फायनान्स जी एम अमोल शिंदे, केन मॅनेजर सदानंद पाटील,शेतकी अधिकारी रमेश बागणवर , दिगंबर माने,युनियनचे सेक्रेटरी राजेंद्र भोसले, पै संतोष भोसले, सुहास गायकवाड, पोपटराव भोसले,ग्रा प सदस्य मच्छिंद्र भोसले आदी उपस्थित होते.दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यावर मोठी रक्कम जमा झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, कारखाना व्यवस्थापनाच्या या निर्णयाची शेतकरी वर्गात चर्चा होत आहे.

















