फलटण प्रतिनिधी :
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय युवा संसदेसाठी फलटणचे युवा संसदपटू तनमन राजेंद्र बर्डे यांची भारत सरकारच्या निवड प्रक्रियेतून थेट निवड झाली आहे. या निवडीमुळे फलटणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
भोपाळ विधानसभेत आयोजित राष्ट्रीय युवा संसदेत देशातील विविध राज्यांतून निवड झालेले युवा प्रतिनिधी सहभागी झाले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या उपस्थितीत तनमन बर्डे यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत संसदीय पद्धतीने प्रभावीपणे आपले विचार मांडले.
या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे युवा संसदपटूंशी संवाद साधला. महाराष्ट्रातील युवा प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी युवकांच्या सहभागाचे तसेच त्यांच्या विचार मांडण्याच्या क्षमतेचे कौतुक केले.
भारत सरकारच्या निवड प्रक्रियेतून राष्ट्रीय युवा संसदेसाठी निवड होणे, भोपाळ विधानसभेत मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधता येणे, हा तनमन बर्डे यांच्या युवा संसदीय प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
यावेळी बोलताना तनमन राजेंद्र बर्डे म्हणाले, “भारत सरकारच्या निवड प्रक्रियेतून राष्ट्रीय युवा संसदेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राची भूमिका मांडता आली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधता आला, हा अनुभव अत्यंत प्रेरणादायी आहे.”
तनमन बर्डे यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल फलटण परिसरातून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या या यशामुळे युवा पिढीला संसदीय लोकशाही, नेतृत्वगुण आणि प्रभावी वक्तृत्वाची प्रेरणा मिळत आहे.















