अनुसूचित जातींसाठी असलेले आरक्षण हे विविध समाजांना एकत्र बांधून ठेवणारे असल्याचे सांगत, आरक्षणाचे वर्गीकरण झाल्यास त्याचा मोठा परिणाम समाजावर होऊ शकतो
फलटण : अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या मुद्द्यावरून फलटण येथे ५८ समाजांच्या माध्यमातून महामोर्चा आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरक्षणाच्या वर्गीकरणामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील समाजांमध्ये फूट पडण्याची शक्यता असल्याचा दावा मोर्चाच्या आयोजकांकडून करण्यात आला आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व समाजबांधवांनी, समाजप्रतिनिधींनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणासंदर्भातील निर्णयावर आयोजकांनी आक्षेप नोंदवत हा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. अनुसूचित जातींसाठी असलेले आरक्षण हे विविध समाजांना एकत्र बांधून ठेवणारे असल्याचे सांगत, आरक्षणाचे वर्गीकरण झाल्यास त्याचा मोठा परिणाम समाजावर होऊ शकतो, अशी भूमिका आयोजकांनी मांडली आहे.
येत्या दोन-तीन दिवसांत अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध समाजांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून महामोर्चाची तारीख, मार्ग व पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
फलटण तालुक्यासह परिसरातील अनुसूचित जाती प्रवर्गातील ५८ समाजांच्या समाजसेवकांनी व प्रतिनिधींनी मोर्चाच्या नियोजनासाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.













