फलटण प्रतिनिधी :
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे तसेच निर्भीड लेखणीच्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे स्वर्गीय नंदकुमार संभाजी मोरे हे एक धाडसी व्यक्तिमत्त्व होते, असे प्रतिपादन फलटण नगर परिषदेचे नगरसेवक पंकज पवार यांनी केले.
स्वर्गीय नंदकुमार संभाजी मोरे यांच्या ५४ व्या जयंतीनिमित्त मोरे कुटुंबीयांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधीर अहिवळे, वरिष्ठ युवा पत्रकार, लेखक व ट्रेनर सचिन मोरे, पत्रकार संदीपकुमार जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोरे कुटुंबीय उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगरसेवक पंकज पवार म्हणाले की, नंदकुमार मोरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक आणि शहरातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर आपली भूमिका मांडली. आपल्या निर्भीड लेखणीच्या माध्यमातून त्यांनी अनेक चुकीच्या गोष्टींवर परखड टीका केली. कोणालाही न घाबरता चुकीच्या प्रवृत्तींवर प्रहार करण्याची त्यांची पद्धत निश्चितच कौतुकास्पद होती. सामाजिक प्रश्नांबाबत त्यांची असलेली जागरूकता आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची त्यांची वृत्ती विशेष उल्लेखनीय होती.
यावेळी बोलताना सचिन मोरे यांनी नंदकुमार मोरे यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा गौरव केला. माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून नंदकुमार मोरे यांची विशेष ओळख होती, असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, नंदकुमार मोरे यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या लेखणीची वेगळी ओळख निर्माण केली होती. फलटण शहराच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर ते अत्यंत नेमकेपणाने आणि परखडपणे भाष्य करत असत. शहरातील प्रश्न मांडताना त्यांची टीका ही केवळ टीकेपुरती मर्यादित नसून त्यामागे शहराच्या विकासाची तळमळ आणि सामाजिक बांधिलकी होती. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य आजही स्मरणात राहणारे आहे. विविध राजकीय पक्षातील प्रमुख मान्यवर्षी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय नंदकुमार मोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत लखन मोरे आणि कपिल मोरे यांनी केले.

















