फलटण :
फलटण ग्रामीण पोलिसांनी विडणी परिसरातील शेतकऱ्यांच्या मोटार चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत आरोपीला जेरबंद केले आहे. महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेण्याच्या गुन्ह्यातील आरोपीकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या तब्बल ८ मोटार चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत विडणी गावाजवळ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेण्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी अर्धव उर्फ चिन्मय छगन सुतार (वय २०, रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा) याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीने विडणी परिसरातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी चोरीच्या मोटारी व संबंधित मुद्देमाल असा एकूण ४ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मागील दहा दिवसांत विविध चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून एकूण १४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सुगनावट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, पोलीस हवालदार नितीन चव्हाण, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, सचिन बावरे, विक्रम बनकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
फलटण ग्रामीण पोलिसांच्या या कामगिरीमुळे चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असून शेतकरी वर्गातून पोलिसांच्या कारवाईचे स्वागत होत आहे.


















