प्रात्यक्षिकादरम्यान परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शेतीतील विविध अडचणी, रोग-किडींचे व्यवस्थापन तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करून आवश्यक मार्गदर्शन केले
शिरसने, ता. बारामती :
आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच उत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने बारामती कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ‘ग्रामीण कृषी कार्य अनुभव’ (RAWE) उपक्रमांतर्गत शिरसने येथे बाजरी पिकाच्या पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित केला.
यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना बाजरीच्या बियाण्याची पेरणीपूर्वी योग्य पद्धतीने बीजोत्प्रक्रिया करण्याचे महत्त्व समजावून सांगितले. बीजोत्प्रक्रियेमुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढण्यास, रोपांची जोमदार व एकसारखी वाढ होण्यास तसेच बियाणे व जमिनीतून पसरणाऱ्या विविध रोगांपासून पिकाचे सुरुवातीच्या टप्प्यात संरक्षण होण्यास मदत होते, याबाबत विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले.
हवामानातील बदलामुळे पिकांवर विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढत असताना पेरणीपूर्वी बियाण्याची योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच जैविक बीजोत्प्रक्रियेमध्ये अझोटोबॅक्टर व पीएसबी यांसारख्या जैविक घटकांचा वापर केल्यास पिकाला पोषक घटक उपलब्ध होण्यास मदत होते आणि रासायनिक खतांवरील खर्चातही बचत होऊ शकते, अशी माहिती देण्यात आली.
या प्रात्यक्षिकादरम्यान परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शेतीतील विविध अडचणी, रोग-किडींचे व्यवस्थापन तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करून आवश्यक मार्गदर्शन केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जयेश भोजने, अभिषेक हरे, सोहम देशमुख, कौस्तुभ खंडागळे, आशिष करवेकर, तनुज लाडे, करण निपुंगे आणि जन्मेजय मुसळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य व मार्गदर्शक प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलेले शास्त्रोक्त मार्गदर्शन ग्रामीण भागातील शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.















