फलटण प्रतिनिधी :
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकांना अडवून लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर पोलिसांनी धडक कारवाई करत दोन संशयितांना अटक केली. या कारवाईमुळे परिसरातील संभाव्य लुटमारीच्या घटना रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.
फलटण तालुक्यातील मांडवखडक गावच्या हद्दीत हॉटेल बांगणगाच्या बाजूला इसम रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना लुटणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना माहिती मिळताच त्यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक घटनास्थळी रवाना केले.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सुमारे २ किलोमीटर पाठलाग करत पाच आरोपींपैकी दोघांना उशाच्या शेतामधून व कुरवलीच्या तलावाजवळून शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून लुटमार व चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत राहुल नाना घुले, रा. इंदिरानगर, फलटण आणि नंदकुमार भागोजी सोनवणे, रा. झिरपवाडी, ता. फलटण यांना अटक करण्यात आली असून, एकूण तीन आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
आरोपींविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस, सुभाष नलवडे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.


















