फलटण :
भारतीय स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत फलटणमध्ये सामाजिक एकतेचा आणि राष्ट्रसेवेचा नवा आदर्श निर्माण झाला. १५ ऑगस्ट रोजी मुधोजी क्लबच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘महारक्तदान शिबिरा’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल ६३६ रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा सामाजिक संदेश दिला.
स्वातंत्र्यदिनाचा उत्सव केवळ ध्वजवंदनापुरता मर्यादित न ठेवता ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. सहयोग सोशल फाउंडेशन, रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन, नेचर अँड वाइल्डलाइफ वेल्फेअर सोसायटी, क्रांतीसूर्य प्रतिष्ठान, महात्मा शिक्षण संस्था तसेच निसर्ग रक्षण व संवर्धन संस्था, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आवाहनाला प्रतिसाद देत सकाळपासूनच युवक, युवती तसेच नागरिकांनी रक्तदानासाठी शिबिरस्थळी गर्दी केली होती. रक्तदानानंतर नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी, यासाठी उभारण्यात आलेला तिरंगी झेंड्याचा विशेष सेल्फी पॉईंट तरुण-तरुणींच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
शिबिराला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, जिल्हा बँक संचालक शिवरूपराजे खर्डेकर, पंचायत समिती उपसभापती अमोल सस्ते, आयडियल इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या डॉ. सौ. वैशाली शिंदे यांच्यासह विविध शासकीय अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
दरम्यान, रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन, फलटण अंतर्गत ‘रक्षक रयतेचा इव्हेंट टीम’च्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल धिरज कचरे तसेच कर्तव्यदक्ष व आदर्श गृहिणी म्हणून सौ. सविताताई तात्यासाहेब गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
६३६ बाटल्या रक्त संकलित करून गरजू रुग्णांना जीवनदान देणारे हे महारक्तदान शिबिर फलटणच्या सामाजिक एकतेचे, राष्ट्रप्रेमाचे आणि वैचारिक प्रगल्भतेचे उत्तम उदाहरण ठरले आहे. विविध सामाजिक संस्था एकत्र आल्यास समाजहिताचे मोठे उपक्रम यशस्वीपणे राबविता येतात, हे या उपक्रमाने दाखवून दिले.
















