फलटण प्रतिनिधी - मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी गेल्या तीन दिवसापासून सुरू केलेल्या साखळी उपोषणास फलटण तालुक्यातील विविध संघटनानी व मुस्लिम समाजाने जाहीर पाठिंबा देत मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान आज चौथ्या दिवशी मराठा आरक्षण मिळण्यासाठी होत असलेल्या साखळी उपोषणाला फलटण तालुक्यातून पाठिंबा वाढत चालला असून फडतरवाडी,चौधरवाडी व गारपीरवाडी येथील महिला पुरुष व युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून प्रांताधिकारी सचिन ढोले यांना निवेदन देत आमच्या आरक्षणाचा प्रश्न सरकार दरबारी मांडून राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण द्यावे अशी जोरदार मागणी केली आहे.
फलटण तालुक्यात ताथवडा, सांगवी, माझेरी, बिबी, निरगुडी, सस्तेवाडी, पिराचीवाडी, गिरवी, निंभोरे, आसु, मुळीकवाडी, मिरढे, राजाळे, शेरेचीवाडी ढवळ, धुमाळवाडी, वाठार निंबाळकर, ढवळेवाडी (निंभोरे), सुरवडी, जिंती, तडवळे, तांबवे, सासवड, घाडगेमळा, झडकबाईचीवाडी, नांदल, राजुरी, तरडगांव, कुरवली खुर्द, चव्हाणवाडी, टाकुबाईचीवाडी, विडणी, वाघोशी, भिलकटी, पिंप्रद, फडतरवाडी, चौधरवाडी, खराडेवाडी या ३७ गावात पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे.
फलटण येथील साखळी उपोषणाचा आजचा चौथा दिवस होता यामध्ये ताथवडा, सांगवी, निंबळक, टाकळवाडे,नाईकबोमवाडी, साठेफाटा,आसू,राजुरी,पिराचीवाडी, गोळेगाव,तामखडा,हनुमंतवाडी,शिंदेनगर व तावडी येथील मराठा बांधव सहभागी झाले होते.यावेळी विविध मराठा समाजातील मान्यवरांनी आपले मते व्यक्त करीत लवकरात लवकर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी अंतिम उपाय हा उपोषण असून आरक्षण देत नाहीत म्हणून पुढील काळात येणाऱ्या कोणत्या ही निवडणुकीत मतदनावर बहिष्कार टाकला जाईल असा इशारा मराठा समाजातर्फे देण्यात आला आहे.



















