फलटण : सचिन मोरे
फलटण पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत ओबीसी समाजासाठी आरक्षित असलेल्या पदावर अन्याय झाल्याचा आरोप करत भाजपा ओबीसी आघाडीचे फलटण तालुका अध्यक्ष व विडणीचे लोकनियुक्त सरपंच सागर कांतिलाल अभंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला आहे. ओबीसी समाजासाठी आरक्षित जागेवर नव्यानेच भाजप मध्ये प्रवेश केलेले विक्रम भोसले यांची मुलगी शिवांजली विक्रम भोसले यांची सभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
फलटण पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीत ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची घटना घडल्याचा आरोप करत त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. ओबीसी समाजासाठी आरक्षित असलेले सभापती पद असताना त्या समाजाला न्याय न मिळाल्याने मन सुन्न झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या संदर्भात बोलताना सागर अभंग म्हणाले की, “मी कोणत्याही नेत्यांविरोधात किंवा पक्षाच्या नेतृत्वाविरोधात बोलत नाही. मात्र ओबीसी समाजासाठी असलेल्या सभापती पदाच्या आरक्षणावर अन्याय का झाला, याचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे मी निषेध नोंदवत भाजपा ओबीसी आघाडीच्या फलटण तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. मी पक्षाचा नाही, तर माझ्या ओबीसी समाजाचा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सागर अभंग हे विडणी गावचे लोकनियुक्त सरपंच असून त्यांनी सभापती निवडीच्या निर्णयाचा जाहीर निषेध करत आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने फलटण तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.










