फलटण प्रतिनिधी -
शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, माळेगाव (बु.), बारामती येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (E&TC) विभागात गेल्या १९ वर्षांपासून प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले तसेच संशोधन केंद्रात आपले संशोधन यशस्वीरीत्या पूर्ण करणारे प्रा. जावेद आयमत हुसेन शेख यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
प्रा. जावेद शेख यांनी “Restoration of Degraded Multi-weather Video for Surveillance Applications” या विषयावर आपला संशोधन प्रबंध सादर केला होता. हे संशोधन Artificial Intelligence (AI) आणि Deep Learning या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून, विविध खराब हवामान परिस्थितींमुळे—जसे की Haze, Rain, Snow तसेच Mixed Weather Conditions—खराब (Degraded) झालेल्या व्हिडिओंचे प्रभावी पुनर्संचयितीकरण (Restoration) कसे करता येईल, याचा सखोल व तांत्रिक अभ्यास करण्यात आला आहे. या माध्यमातून सुरक्षा व निगराणी प्रणाली अधिक स्पष्ट, अचूक आणि विश्वासार्ह कशी करता येईल, यावर विशेष भर देण्यात आला आहे.
या संशोधन कार्यासाठी त्यांना डॉ. शैलेन्द्रकुमार महादेव मुकणे यांचे संशोधन मार्गदर्शक (Research Guide) म्हणून मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे सदर संशोधन तांत्रिकदृष्ट्या सक्षम, नाविन्यपूर्ण तसेच व्यावहारिक उपयोगासाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे.या संशोधनाचे महत्त्व सुरक्षा व्यवस्था, स्मार्ट सिटी प्रकल्प तसेच ही प्रणाली भविष्यात ऑटोमोबाईल, विमानवाहतूक व रेल्वे वाहतूक क्षेत्रात , वाहतूक नियंत्रण प्रणाली(RTO), औद्योगिक निगराणी तसेच संरक्षण क्षेत्रामध्ये विशेष उपयुक्त ठरणारे आहे. बहुवातावरणीय (Multi-weather) परिस्थितीत स्पष्ट, दर्जेदार व विश्वासार्ह व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात हे संशोधन भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, संशोधन काळात प्रा. जावेद आयमत हुसेन शेख यांनी Springer Nature, Taylor & Francis तसेच CVIP (Computer Vision and Image Processing) या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये व कॉन्फरन्समध्ये मिळून एकूण सहा (6) संशोधन पेपर्स प्रकाशित केले असून, त्यामुळे त्यांच्या संशोधन कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.
त्यांनी आपले पदवी शिक्षण (B.E.) शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून पूर्ण केले असून, त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण (M.Tech..) हे प्रतिष्ठित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे (COEP), पुणे येथून प्राप्त केले आहे. या यशामागे त्यांच्या कुटुंबियांचे मोलाचे पाठबळ लाभले आहे.प्रा. जावेद आयमत हुसेन शेख यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल संस्थेचे व्यवस्थापन, सचिव , प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, सहकारी व मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील संशोधन व शैक्षणिक वाटचालीस सर्व स्तरांतून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.


















