फलटण :
सणासुदीच्या काळात पतंगबाजी करताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, तसेच विजेच्या तारांमध्ये मांजा अडकून अपघात होऊ नयेत यासाठी मांजाचा वापर टाळावा, असे आवाहन महावितरणच्या फलटण शहर उपविभागाकडून करण्यात आले आहे.
पतंग उडविताना मांजा उच्चदाब व लघुदाब वीजवाहिन्यांमध्ये अडकून त्या एकमेकांच्या संपर्कात येण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्पार्क होऊन वीजवाहिन्यांमध्ये बिघाड निर्माण होऊ शकतो आणि परिसरातील वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता असते. तसेच मांजा विजेचा सुवाहक असल्याने त्याच्या संपर्कामुळे गंभीर दुखापत किंवा जीवितहानी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
नागरिकांनी मोकळ्या जागेत, उंच झाडे आणि वीजवाहिन्या नसलेल्या ठिकाणीच पतंग उडवावा. मांजाऐवजी साध्या दोऱ्याचा वापर करावा. वीजवाहिनी तुटलेली अथवा त्यामध्ये मांजा अडकलेला आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून त्याला स्पर्श न करता तातडीने महावितरणला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
वीजपुरवठा सुरळीत राहण्यासोबतच नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सर्वांनी महावितरणच्या या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण, फलटण शहर उपविभाग यांच्याकडून करण्यात आले आहे.

















