फलटण प्रतिनिधी :
श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल, फलटण येथे आज डॉ. बी. आर. आंबेडकर आयआयटी सेंटर, फलटण यांच्या वतीने प्रशालेतील शिक्षकांसाठी ‘Master AI Training’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव मा. श्री. डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेचा उद्देश शिक्षकांनी आपल्या दैनंदिन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणे हा होता.
कार्यशाळेच्या प्रारंभी डॉ. बी. आर. आंबेडकर आयआयटी सेंटर, फलटणचे प्रमुख मा. श्री. शेखर कांबळे, मा. सौ. मनीषा कांबळे तसेच तंत्रस्नेही शिक्षिका कु. साक्षी भिवरकर, पत्रकार सचिन मोरे यांचे प्रशालेच्या वतीने स्वागत प्राचार्या सौ. विजया सुरवसे यांनी केले.
प्रशिक्षणादरम्यान ChatGPT, Suno AI आणि MagicSchool.ai यांसारख्या विविध AI साधनांची शिक्षकांना सविस्तर माहिती देण्यात आली. श्री. शेखर कांबळे, सौ. मनीषा कांबळे व कु. साक्षी भिवरकर यांनी साध्या व सोप्या भाषेत AI तंत्रज्ञानाचा शैक्षणिक क्षेत्रातील वापर समजावून सांगितला.
AI च्या माध्यमातून पाठयोजना, शैक्षणिक साहित्य, विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक उपक्रम तसेच विविध अध्यापन पद्धती अधिक प्रभावीपणे तयार करता येतात, याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे माहिती देण्यात आली. AI च्या योग्य वापरामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक मनोरंजक, सुलभ आणि विद्यार्थीकेंद्रित होऊ शकते, याचा अनुभव शिक्षकांना या प्रशिक्षणातून मिळाला.
प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना AI प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांना AI च्या माध्यमातून अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयोजित ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली.
सूत्रसंचालन व आभार सौ. सुजाता जाधव मॅडम यांनी मानले.

















