फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत असल्याची चर्चा असून, नुकतेच रुजू झालेले पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर या अवैध व्यवसायाला आळा घालण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणात व्याजाने पैसे देण्याचे व्यवहार सुरू असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून काही खाजगी सावकारांनी तालुक्यात स्वतःचे जाळे निर्माण केले आहे. गरजूंना, शेतकरी, शेतमजूर तसेच आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांना मोठ्या व्याजदराने पैसे दिले जात असल्याचे सांगितले जाते. कर्जाची रक्कम किंवा व्याज वेळेवर न भरल्यास संबंधितांना मानसिक त्रास, धमक्या आणि दबावाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारीही अधूनमधून पुढे येत आहेत.
नुकत्याच वाठार निंबाळकर येथे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनंतर खाजगी सावकारीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कर्जाच्या तणावामुळे संबंधित व्यक्तीने आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे ग्रामीण भागातील सावकारी व्यवहारांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील काही राजकीय व्यक्ती कडून सावकारीचा व्यवसाय केला जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसेच काही राजकीय पाठबळ असलेल्या व्यक्तींचाही या व्यवहारांशी संबंध असल्याचा आरोप स्थानिक स्तरावर केला जात आहे. त्यामुळे अशा अवैध व्यवहारांवर कारवाई करताना प्रशासनासमोर अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात.
नवीन डीवायएसपी म्हणून पदभार स्वीकारलेल्या धन्यकुमार गोडसे यांच्याकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. खाजगी सावकारी, अवैध व्याजव्यवहार आणि कर्जदारांच्या छळाच्या घटनांवर कठोर कारवाई करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत सावकारीच्या वाढत्या विळख्यातून नागरिकांची सुटका करण्याचे मोठे आव्हान सध्या पोलीस प्रशासनासमोर उभे आहे.
फलटण तालुक्यातील अनेक सावकारांनी आपले मोठे रॅकेट निर्माण केले असून या सावकारांचे नावे लवकरच जनतेसमोर येणार आहेत.











