विडणी प्रतिनिधी :
फलटण तालुक्यातील विडणी येथील परमपूज्य सद्गुरु शिवाजी महाराज मंदिरात रविवारी (दि. ७ जून २०२६) भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी श्री सद्गुरु शंकर महाराजांच्या पावन पादुकांचे दर्शन भाविकांसाठी आयोजित करण्यात आले होते.
सकाळी श्री सद्गुरु शंकर महाराजांच्या पादुकांचे मंदिरात मोठ्या भक्तिभावाने आगमन झाले. यानंतर श्री सद्गुरु शंकर महाराज पादुका, श्री सद्गुरु शिवाजी महाराज समाधी, श्री सद्गुरु कुलकर्णी महाराज (आईसाहेब) मूर्ती तसेच श्री सद्गुरु विठ्ठल महाराज (तात्या) समाधीस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर श्रींची महाआरती संपन्न झाली व श्री शंकरगीता पारायणास प्रारंभ झाला.
या धार्मिक सोहळ्यास भाविक भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. पारायणादरम्यान संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. पारायणानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी त्याचा लाभ घेतला. श्रद्धा, भक्ती आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा भव्य धार्मिक सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.
यावेळी अध्यात्मिकतेला फलटणच्या पत्रकारांनी दिलेल्या सहकार्याबद्दल धनकवडी (पुणे) येथील शंकर महाराज मठातील भक्तांनी विशेष समाधान व्यक्त केले. आध्यात्मिक पत्रकारिता जपण्याचे कार्य फलटणमधील पत्रकारांकडून होत असल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री मिलिंद कदम (सांगवी, बारामती), श्री निखिल उर्फ बाबूदादा वाघमारे (धनकवडी, पुणे) आणि श्री जयवंत कर्वे (विडणी, फलटण) यांच्या पुढाकाराने करण्यात आले. व्यासपीठ चालक सौ. उर्मिलाताई निवंगुणे यांच्या सहकार्याने तसेच फलटण येथील सद्गुरू हरिबाबा मंदिराच्या ओम दत्त ओम चिले भजनी मंडळ व स्वामी समर्थ मंडळ फलटणच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.











