दालवडी, ता. फलटण येथील श्रीनाथ रोकडेश्वर यात्रा दि. १७ ते २१ एप्रिल दरम्यान साजरी होणार आहे. या उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीनाथ रोकडेश्वर हे जागृत देवस्थान प्रसिद्ध आहे. रोकडा न्याय देणारा या अर्थाने रोकडेश्वर हे नाव रूढ झाले आहे. या यात्रा उत्सवामध्ये मुंबई, पुणे येथील चाकरमानी व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. यात्रेतील कार्यक्रमानुसार सोमवार, दि. १७ रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीनाथ रोकडेश्वर देवाचा हळदी समारंभ होणार असून रात्री १० वाजता भजनी मंडळ, दालवडी यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार, दि. १८ रोजी दुपारी ३.३० वाजता श्रीनाथ रोकडेश्वराचा लग्न सोहळा, रात्री ९ वाजता हंगामा म्युझिकल नाईट, कोल्हापूर यांचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवार, दि. २० रोजी रात्री १० वाजता मालती इनामदार यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. शुक्रवार, दि. २१ रोजी पहाटे ५ ते ९ या वेळेत श्री नाथ रोकडेश्वर देवाचा छबिना होणार आहे. त्यानंतर सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत मालती इनामदार यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. दुपारी ४ ते ६ या वेळेमध्ये कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे. कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थ मंडळ, दालवडी यांनी केले आहे.



















