फलटण प्रतिनिधी :
फलटण शहरात अंतर्गत रस्त्यांची कामे सध्या वेगाने सुरू आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी सर्व संबंधित ठेकेदारांची बैठक घेऊन, प्रलंबित व जुनी कामे प्रथम पूर्ण करावीत आणि नव्याने शहरातील रस्ते उकरण्याचे काम करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते.
असे असतानाही आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता संबंधित ठेकेदाराकडून पुन्हा उकरण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे नगराध्यक्षांनी दिलेल्या स्पष्ट आदेशालाच कोलदंडा दाखविण्यात आल्याची चर्चा फलटण शहरात रंगू लागली आहे.
वारंवार रस्ते उकरण्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी, धुळीचा त्रास आणि गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारांवर प्रशासन कोणती कारवाई करणार, तसेच नगराध्यक्षांच्या आदेशाची अंमलबजावणी नेमकी कशी होणार, याकडे आता फलटणकरांचे लक्ष लागले आहे.











