सातारा. दि 13: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि.18 ते 23 जून या कालावधीत सातारा जिल्ह्यातून मार्गक्रम करणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा घेतला.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, अद्याप मान्सुनला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पिण्याचे पाण्याचे स्त्रोत तसेच त्या स्त्रोतातून दिवसाकाठी किती टँकर भरले जाऊ शकतात तसेच पालखी मार्गाचे शेजारील गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत आहेत का याची खात्री करावी. पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना पालखी तळ, विसावा, सुलभ शौचालय, हिरकणी कक्ष, गॅस सिलेंडर वाटप, पिण्याचे पाणी, स्नानगृह इत्यादीबाबत माहिती दर्शविणारा नकाशा ठिकठिकाणी लावावा यामुळे वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही.
पालखी सोहळ्यानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रावरील सर्व निवासी डॉक्टर यांच्या चोवीसतास कालावधीसाठी नेमणुका कराव्यात अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, पायी वारी सोहळ्यामध्ये पॅकबंद पाण्याच्या बॉटल विक्री करण्यात येते हे पाणी पिण्यायोग्य आहे अगर कसे याबाबत खातरजमा करावी यासाठी फिरत्या पथकांची नियुक्ती करावी.तसेच पालखी कालावधीत पालखी मार्गावर तसेच पालखी तळावर विज पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्यावी.
पालखी मार्गावरील मटण, मांस, बिअर बार तसेच मद्य विक्रेते यांना बंद ठेवण्याबाबत अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी कार्यवाही करावी तसेच मार्गावर दर दोन कि.मी. अंतरावर वैद्यकीय पथक व रुग्णवाहिका सज्ज ठेवावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी केल्या.
आषाढी वारी करिता ॲपची निर्मिती
आषाढी वारीकरिता वारकरी, भाविक व नागरिक यांना एका क्लिकवर आवश्यक ती सर्व माहिती संपर्क उपलब्ध होण्यासाठी व पंढरपुर येथील विठ्ठल रुक्मिणी यांचे थेट दर्शनासाठी पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासनाने ॲप तयार केले आहे.
ॲप डाऊनलोड करण्यासाठी https://bit.ly/3wZUC5G हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर आपल्या समोर एक लॉगिन चे ऑप्शन येईल तेथे google चा सिम्बॉल येईल त्यावर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईमध्ये जो mail ID रजिस्टर आहे त्याचा ऑप्शन येईल त्यावरती क्लिक केल्यानंतर आपले लॉगिन ॲप मध्ये होईल.नंतर ओपन ॲप वापरायला सुरु करु शकता.

















