फलटण प्रतिनिधी:- चालू वर्षी तुटणाऱ्या ऊसाला ३५०० व मागील वर्षाचे ४०० द्या अन्यथा तालुक्यातील कारखान्यांची ऊस वाहतूक बंद करणार व येणाऱ्या परिणामांना सामोरे जा असा इशारा फलटण तालुक्यातील चार साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेनाद्वारे दिला आहे.
आमची दिवाळी कडू करून तुमची दिवाळी गोड होणार हे आम्हाला मान्य नाही मागील गळीत वर्षाचा रू.४०० न देता १०० रुपये देऊन आम्हाला फक्त चटणी भाकरीच मिळेल यातच आमची दिवाळी कडू होणार असून तुम्हीही चटणी भाकर खाऊन दिवाळी गोड करा व नवीन दर जाहीर करा या मागणीसाठी
फलटण तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज श्री दत्त इंडिया प्रा लिमिटेड साखरवाडी,स्वराज साखर कारखाना उपळवे ,शरयू साखर कारखाना कापशी , श्रीराम जवाहर साखर कारखाना फलटण या चार कारखान्यांच्या प्रतिनिधीना शांततेच्या मार्गाने निवेदन देत भाकरी खर्डा भेट देण्यात आली.
संपुर्ण महाराष्ट्रात मा. खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात ऊस दर आंदोलन चालू आहे दि. ७ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या राजव्यापी ऊस परिषदेमधील मागणीनुसार गेल्या वर्षी गाळप झालेल्या ऊसाचा दुसरा हप्ता प्रती टन ४०० रुपये शेतकऱ्यांना मिळावा व चालू वर्षी गाळप होणाऱ्या ऊसाचा प्रती टन ३५०० रुपये एकरकमी ऊस दर ऊस उत्पादकांना मिळावा यासाठी कारखान्याला निवेदन देत असून त्याचबरोबर आपल्या कारखान्याला यावेळेला भाकरी खर्डा दिवाळी भेट शांततेच्या मार्गाने देत आहे.
जर शेतकऱ्यांच्या ऊस दराची मागणी पुर्ण झाली नाही तर आपल्या कारखान्यांची ऊस वाहतूक बंद करणार असून येणाऱ्या परिणामांना सामोरे जा असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी म्हटले आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर,राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे,जिल्हा सरचिटणीस डॉ.रवींद्र घाडगे, तालुकाध्यक्ष नितीन यादव,पक्ष तालुकाध्यक्ष दादा जाधव,शहराध्यक्ष सचिन खानविलकर,किरण भोसले, बाळासाहेब शिपकुले,प्रल्हाद अहिवळे,धनंजय जाधव हवालदार,अजित भोसले,केतन जाडकर,सागर जावळे यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.



















