मुंबई :
२३ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र बंद दिल्लीत नीट (NEET) परीक्षा सुधारणांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने (VBA) २३ जुलै २०२६ रोजी 'महाराष्ट्र बंद' पुकारला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी संघटना आणि नागरिकांना या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद परिसरात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई ही लोकशाहीला न शोभणारी आहे. अशा दडपशाहीविरोधात आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे.
दरम्यान, दिल्लीतील आंदोलनाला आता विविध राजकीय पक्षांकडूनही पाठिंबा मिळू लागला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांनी जंतर-मंतरवर जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेही विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातही या आंदोलनाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. पुण्यात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. मुसळधार पावसातही कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
मुंबईतील दादर परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आंदोलन केले. या आंदोलनात मनसे नेत्या शर्मिला ठाकरे सहभागी झाल्या होत्या. शेकडो कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ घोषणा देत केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला. अशातच आता महाराष्ट्र बंदच्या घोषणेमुळे येत्या २३ जुलै रोजी राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.










