फलटण, दि. २८ जून :
तिरकवाडी गावचे सुपुत्र, जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तसेच आदरणीय आनंदराव खाशाबा शितोळे (बाबा) यांचे वयाच्या ८७व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने तिरकवाडीसह पंचक्रोशीतील शैक्षणिक, सामाजिक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
आनंदराव शितोळे यांनी जय भवानी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची स्थापना करून ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. शिक्षणाचा प्रसार, समाजहिताची तळमळ आणि विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम यामुळे त्यांनी समाजात वेगळे स्थान निर्माण केले होते.
त्यांनी घालून दिलेला शिक्षणाचा आदर्श, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावी कार्याचा वारसा भावी पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रातील एक समर्पित व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
अंत्यविधी :
त्यांची अंत्ययात्रा आज, रविवार (२८ जून) रोजी सकाळी ११ वाजता फलटण येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघणार असून त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.










