फलटण, दि. 27 जुलै :
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) अभियानांतर्गत फलटण नगरपरिषदेच्या वतीने मंगळवार, दि. 28 जुलै 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत BSNL कार्यालयाशेजारील नगरपरिषदेच्या सभागृहात वॉर्ड सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभांमध्ये संबंधित प्रभागातील गैरहजर, स्थलांतरित, मयत व दुबार (ASDD) मतदारांची भागनिहाय यादी वाचून दाखविण्यात येणार असून, नागरिकांकडून मिळणाऱ्या माहितीची नोंद घेण्यात येईल. त्यानंतर संबंधित बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्यामार्फत प्रत्यक्ष पडताळणी करून आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे.
मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्याच्या उद्देशाने प्रत्येक प्रभागातील ASDD मतदारांची भागनिहाय यादी तयार करण्यात आली असून, या प्रक्रियेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी शहरातील सर्व नागरिक तसेच बूथ लेव्हल एजंट (BLA) यांनी आपल्या प्रभागातील वॉर्ड सभेला उपस्थित राहून मतदार यादी शुद्धीकरणाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
"अचूक व अद्ययावत मतदार यादी हा सक्षम लोकशाहीचा पाया आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे," असेही नगरपरिषदेच्या वतीने प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.










