फलटण प्रतिनिधी :
सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी गुरुवार दि. ४ जून २०२६ रोजी विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट देऊन गावातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, सार्वजनिक सुविधा तसेच विविध ग्रामविकास योजनांची पाहणी करताना कामांची गुणवत्ता अबाधित ठेवून सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांबाबत माहिती घेत ग्रामस्थांशी संवाद साधला. नागरिकांच्या अडचणी, समस्या व सूचना जाणून घेत विकासकामे अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी मार्गदर्शन केले.
या भेटीदरम्यान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, गटविकास अधिकारी प्रकाशकुमार बोंबले, लोकनियुक्त सरपंच सागर कांतीलाल अभंग, विस्तार अधिकारी शिंदे साहेब, आप्पासो गौंड साहेब, उपअभियंता भुजबळ साहेब, विविध शाखांचे अभियंते, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी टेंबरे आण्णा तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या या भेटीमुळे विडणी ग्रामपंचायतीतील विकासकामांना अधिक गती मिळणार असून गावाच्या सर्वांगीण प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.










