फलटण | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार सचिन पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने फलटण तालुक्यात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सेवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर बुधवार (दि. २२ जुलै २०२६) रोजी फलटण शहरात विविध समाजोपयोगी उपक्रम उत्साहात पार पडले.
यामध्ये महाराजा मंगल कार्यालय येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. तसेच उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. जिंती नाका येथील नगरपरिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वह्या व पुस्तकांचे वितरण करण्यात आले. मंगळवार पेठ परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांसाठी अन्नदान सेवेचेही आयोजन करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले की, "लोकनेते स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी करताना मनामध्ये अत्यंत दुःखाची भावना आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि सर्वांगीण विकासात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांनी केलेले कार्य महाराष्ट्रातील जनता कधीही विसरणार नाही. विकासाच्या प्रत्येक चर्चेत त्यांचे स्मरण कायम राहील. त्यांच्या विचारांचा आणि विकासाभिमुख कार्याचा वारसा आम्ही कार्यकर्ते म्हणून सदैव पुढे नेण्याचा प्रयत्न करू."
यापुढील काळात सेवा सप्ताहाच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक व जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही आमदार सचिन पाटील यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमास पंचायत समिती सभापती शिवांजली भोसले, ज्येष्ठ नेते डी. के. अण्णा पवार, माजी सभापती रामभाऊ ढेकळे, महिला मोर्चा अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, युवक मोर्चा अध्यक्ष अतुल शहा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांचे नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










