फलटण प्रतिनिधी :
तुमचे पक्षासाठी योगदान काय?: संजीवराजे, चंद्रहार पाटील किंवा रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते आहेत. चंद्रकांत जाधवांनी थेट विचारले की, "या मुलाखत बहाद्दरांनी जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून कधी लाठ्या-काठ्या खाल्ल्या आहेत का? यांच्यावर कधी गुन्हे दाखल झालेत का? यांनी किती नवीन कार्यकर्ते पक्षात जोडले?" ज्यांनी पक्षासाठी कधी घाम गाळला नाही, ते निष्ठावंतांची पात्रता कशी ठरवू शकतात, असा जळजळीत सवाल चंद्रकांत जाधवांनी केला आहे.
रविवार, दिनांक १४ जून रोजी कोळकी (फलटण) येथील अनंत मंगल कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत या मुलाखती पार पडणार आहेत.या निवड प्रक्रियेसाठी पक्षाने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, माढा लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख चंद्रहार पाटील, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे आणि महिला आघाडीच्या रेश्मा जगताप यांची 'निरीक्षक' म्हणून नियुक्ती केली आहे. हीच नावे समोर आल्यानंतर अनेक वर्षांपासून पक्षात सक्रिय असणाऱ्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा स्वाभिमान दुखावला गेला आणि वादाची ठिणगी पडली.
शिवसेना (शिंदे गट) पक्षांतर्गत चालू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे सातारा जिल्ह्यातील राजकारण अत्यंत तापले असून निष्ठावंत विरुद्ध नवखे असा उघड संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. पक्षातील विविध पदांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम जाहीर होताच, सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचा आक्रमक चेहरा आणि विद्यमान जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. "तीस-तीस वर्षे पक्षासाठी रक्त-घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांची परीक्षा काल-परवा पक्षात आलेले लोक घेणार का?" असा थेट आणि अत्यंत खरमरीत सवाल उपस्थित करत जाधव यांनी पक्षनेतृत्वालाच जाहीर आव्हान दिले आहे.
शनिवारी साताऱ्यात निष्ठावंतांचा एल्गार; मोठ्या निर्णयाची शक्यता
या 'मुलाखत' संस्कृतीच्या नावाखाली जुन्या आणि प्रामाणिक शिवसैनिकांचा जो अपमान सुरू आहे, त्याला सामूहिक उत्तर देण्याची तयारी आता सुरू झाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर पुढील रणनीती ठरवण्यासाठी चंद्रकांत जाधव यांनी शनिवार, दिनांक १३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता सातारा येथे जिल्ह्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.या बैठकीला संपूर्ण जिल्ह्यातून जुने शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, पक्षनेतृत्वाच्या या भूमिकेविरोधात मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या अंतर्गत बंडाचा सामना शिवसेना नेतृत्व कसा करणार, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राजे गटाला पक्षात आणले, तेच आता तारणहार?: फलटणच्या निंबाळकर 'राजे गटाचा' शिवसेनेत प्रवेश घडवून आणण्यात चंद्रकांत जाधव यांचा मोठा पुढाकार होता. आता ज्यांना पक्षात आणले, तेच संजीवराजे हे जाधव यांना पदावर ठेवायचे की नाही, हे ठरवणार असतील तर "अजब तुझे सरकार" असेच म्हणावे लागेल, अशी चपराक चंद्रकांत जाधव यांनी लगावली.











