फलटण | सचिन मोरे
- देशात सामाजिक न्याय, समता आणि आरक्षण धोरणाचा पाया रचणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती दरवर्षी 26 जून रोजी साजरी केली जाते. मात्र आधुनिक भारताच्या सामाजिक परिवर्तनातील त्यांच्या अमूल्य योगदानाच्या तुलनेत त्यांच्या जयंतीबाबत समाजात अपेक्षित जागरूकता आणि उत्साह दिसून येत नसल्याचे वास्तव आहे.
फलटण शहरातही यंदा राजर्षी शाहू महाराजांची जयंती प्रामुख्याने बौद्ध नगर परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या पुढाकारातून साजरी होत आहे. अनेक वर्षांपासून या भागात शाहू महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन, विचारप्रबोधन कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र शहरातील इतर भागांत या जयंतीबाबत विशेष हालचाल दिसून येत नसल्याची चर्चा आहे.
राजर्षी शाहू महाराज यांनी 1902 साली कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू करून भारतीय समाजव्यवस्थेत ऐतिहासिक क्रांती घडवून आणली. शिक्षण, नोकरी आणि शासन व्यवस्थेत वंचित घटकांना संधी मिळावी यासाठी त्यांनी दूरदृष्टीने निर्णय घेतले. त्यामुळेच त्यांना भारतातील आरक्षणाचे आद्य प्रवर्तक म्हणून गौरविले जाते.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक सुधारणांच्या कार्याला राजर्षी शाहू महाराजांनी राजसत्तेची ताकद दिली. अस्पृश्यता निर्मूलन, शिक्षणाचा प्रसार, स्त्री शिक्षण, शेतकरी आणि कामगार कल्याण यांसारख्या अनेक क्षेत्रांत त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. पुढे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या चळवळीला देखील शाहू महाराजांचे सहकार्य लाभले.
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. गावोगावी मिरवणुका, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र सामाजिक समतेचे पुरस्कर्ते असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीला तितकाच व्यापक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. ही बाब सामाजिक विचारवंत आणि अभ्यासकांच्या चिंतेचा विषय ठरत आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे की, शाहू महाराजांचे कार्य कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण भारतीय समाजाच्या उन्नतीसाठी होते. त्यामुळे त्यांची जयंती सर्व समाजघटकांनी एकत्रितपणे साजरी करणे आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करणे ही काळाची गरज आहे.
आज सामाजिक समता, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सर्वसमावेशक विकास यांची चर्चा होत असताना राजर्षी शाहू महाराजांचे विचार अधिकच प्रेरणादायी ठरतात. त्यांच्या जयंतीनिमित्त केवळ अभिवादन न करता त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प समाजाने करणे, हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल.
- राजर्षी शाहू महाराजांचे महत्त्वपूर्ण कार्य
- 1902 मध्ये आरक्षण धोरणाची अंमलबजावणी
- मोफत व सक्तीच्या शिक्षणाला प्रोत्साहन
- अस्पृश्यता निर्मूलनासाठी ठोस पावले
- स्त्री शिक्षणाला चालना
- शेतकरी, कामगार आणि वंचित घटकांसाठी कल्याणकारी योजना
- महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पाठबळ
- "सामाजिक समतेचा विचार जिवंत ठेवायचा असेल तर राजर्षी शाहू महाराजांचे कार्य प्रत्येक घरापर्यंत पोहोचले पाहिजे."











