फलटण प्रतिनिधी :
श्री भैरवनाथ संस्था समूहाचे प्रमुख, श्री भैरवनाथ मल्टिस्टेटचे संस्थापक व मार्गदर्शक संचालक, भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब श्रीरंग मोहोळकर (कासार) यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन रविवार, दि. २ ऑगस्ट रोजी आदर्की बुद्रक, ता. फलटण येथे करण्यात येत असून त्यामध्ये सहभागी होवून परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
बाळासाहेब मोहोळकर (कासार) यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त भैरवनाथ संस्था समूह व सेवा सदन लाईफ लाईन हॉस्पिटल, मिरज यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य व बालाजी ब्लड बँक, सातारा यांच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
बालाजी ब्लड बँक, सातारा यांच्या रक्तदान माध्यमातून शिबिराचे आयोजन सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळात भैरवनाथ सांस्कृतिक आदर्की पतसंस्था भवन, बुद्रक व ॲम्बिशन इंग्लिश मीडियम स्कूल आदर्की बुद्रक, ता. फलटण येथे करण्यात येत आहे.
रक्तदान महादान जीवनदान चला जोडू या रक्ताचे नाते या उद्देशाने रक्तदान शिबिरात १८ ते ६५ वर्षापर्यंत कोणतीही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. रक्तदान करण्यासाठी ५ ते १० मिनिटांचा वेळ लागतो. निरोगी व्यक्तीचे रक्त ३५० ते ४५० मि. ली. घेतले जाते. ते भरून येण्यासाठी २४ ते ४८ तासांचा कालावधी लागतो. एका रक्तदानाचा फायदा चार रुग्णांना होऊ शकतो. रक्तदानाने अशक्तपणा, थकवा किंवा लैंगिक शक्तीचा ऱ्हास होतो हा गैरसमज आहे. रक्तदानाने दुसऱ्याचे जीव वाचवणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र व रक्तगट कार्ड दिले जाईल.
रक्तदान केल्यानंतर शरीरात नवीन रक्त तयार होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला चालना मिळते. रक्तदात्याला स्वतःसाठी आयुष्यभर एक रक्त बाटली मोफत दिली जाईल. रक्तदात्याच्या आई, वडील, भाऊ, बहीण (लग्नाअगोदर), पत्नी, मुले यांच्यासाठी दोन वर्षापर्यंत एक रक्त बाटली मोफत दिली जाईल, रक्तदात्याच्या तसेच मित्रपरिवारास रक्ताची गरज भासल्यास सवलतीच्या दरामध्ये रक्त देण्यात येणार असल्याचे बालाजी ब्लड बँक, सातारा यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.
सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सेवासदन लाईफ लाईन हॉस्पिटल मिरज यांच्या सहकार्याने आदर्की व पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात हृदयरोग, युरोलॉजी, डोळे, कॅन्सर, रक्त तपासणी मोफत करण्यात येणार असून किडनी स्टोन शस्त्रक्रिया
आणि अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. पॅरालिसीस, अपंग, लाळेपणा, संधिवात अशा लोकांसाठी अल्पदरात पंचकर्म उपचार केले जाणार आहेत.
लहान मुलांना छातीत होल असणे तसेच कान, नाक, घसा शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. डोळ्यांचे मोतीबिंदू, लासरू, काचबिंदू, रेटिना लासरू, मांस काढणे अशा सर्व नेत्र शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. त्यासाठी रुग्णाने स्वतःचे रेशनकार्ड व आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
भैरवनाथ संस्था समूहाच्या माध्यमातून आदर्की व पंचक्रोशीत विविध प्रकारचे वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ बाळासाहेब मोहोळकर (कासार) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आदर्की बुद्रक येथे करण्यात येणार आहे. आदर्की व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.










