फलटण प्रतिनिधी:- पाठलाग करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणाच्या विरोधात पोक्सो अंतर्गत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २ जून २०२३ सकाळी १० ते दिनांक ४ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुधोजी कॉलेज ते तेली गल्ली,फलटण व एस.टी.स्टँण्डवर,फलटण ता.फलटण जि.सातारा येथे फिर्यादी अल्पवयीन मुलीस गणेश सुभाष घोरपडे (वय-२२ वर्षे रा. मोळ ता. खटाव जि.सातारा) याने "मला तु आवडतेस, तुझ्यासोबत बोलायचे आहे" असे म्हणुन फिर्यादी अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला व "माझे तुझ्यावर प्रेम होते.तरी पण तु माझी तक्रार केलीस आता बघ तुला सोडणार नाही मी जेल मधुन सुटलेलो आहे व आता तुझे लग्न होवु देणार नाही" असे म्हणाला यावर फिर्यादी मुलगी त्यास "मला तुझ्या सोबत बोलायचे नाही" असे म्हणाली असता फिर्यादी मुलीस संशयित आरोपीने मुलीस शिवीगाळ,दमदाटी केली. याप्रकरणी गणेश सुभाष घोरपडे याच्या विरोधात फिर्यादी अल्पवयीन मुलीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्या अनुषंगाने संशयित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दिपाली गायकवाड करत आहेत.



















