फलटण प्रतिनिधी -
मागील आठवड्यात बडेखान-साखरवाडी रस्ता दुरुस्ती बाबत प्रसार माध्यमातून स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. या मागणीला आता यश प्राप्त झाले आहे. लवकरच कामाची सुरुवात होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सौ. मसके मॅडम यांनी सांगितले बडेखान-साखरवाडी रस्त्याचे सध्या कारखाना चालू असल्यामुळे कारखान्याची ऊस वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे रस्ता पुन्हा खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तात्पुरते या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी साईड पट्ट्या भरून घेऊन रस्त्यातील खड्डे बुजवुन घेतले जातील. व कारखाना बंद झाल्यानंतर फेब्रुवारी अखेरीस या रस्त्यावर कार्पेट चे काम केले जाईल. असे आश्वासन सौ. मसके मॅडम यांनी दिले आहे.
फलटण नायब तहसीलदार अभीजीत सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आंबेकर, व सौ. मसके मॅडम यांनी या रस्त्याचे दुरुस्तीचे काम चालू करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली. तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्यामुळे या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्यास सहकार्य लाभले. त्यामुळे खराडेवाडी, तडवळे, घाडगेमळा, नांदल, काळज, साखरवाडी, खामगाव, मुरूम या गावातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
अतिशय बिकट परिस्थिती या रस्त्याची झाली होती. नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे ग्रामस्थांकडून समाधान व आनंद व्यक्त होत आहे.











