फलटण :
येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, तसेच प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा या मागणीसाठी फलटण शहरात नागरिकांच्या व सामाजिक संघटनांच्या वतीने कँडल मार्च काढण्यात आला. न्यायासाठी झालेल्या या शांत मोर्चामध्ये विविध क्षेत्रातील नागरिक, महिला वर्ग, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संध्याकाळी शहरातील महात्मा गांधी चौकातून हा कँडल मार्च निघाला. "डॉ. संपदाला न्याय मिळालाच पाहिजे", अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. उपस्थितांनी मेणबत्त्या पेटवून डॉ. मुंडे यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
कँडल मार्चच्या शेवटी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, महिलांच्या सुरक्षेबाबत प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, तसेच डॉक्टर समुदायावरील वाढत्या तणावाच्या घटनांकडे शासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या कँडल मार्चचे आयोजन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांनी केले होते. यावेळी आमदार सचिन पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे सचिन सूर्यवंशी, सौ. प्रतिभा चेतन शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अमीर शेख, यांच्यासह सामाजिक, राजकीय संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार, डॉक्टर्स तसेच स्थानिक तरुण वर्ग सक्रियपणे सहभागी झाले होते.











