फलटण प्रतिनिधी -
गेल्या अनेक वर्षांपासून फलटण पंचायत समितीची आमसभा झालेली नाही तरी सदर आमसभा त्वरित घेण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे यांनी केली आहे. आमसभा म्हणजे आपल्या समस्या शासनदरबारी मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ आहे मात्र अनेक वर्षांपासून आजपर्यंत आमसभा झाल्या नाहीत यामुळे सर्वसामान्यातून संताप व्यक्त होत असताना दिसून येत आहे..फलटण तालुक्याचे तत्कालीन माजी आमदार स्वर्गीय चिमणराव कदम साहेब यांच्या कार्यकालावधीमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली दर वर्षी आमसभा घेण्याचा प्रघात होता. चिमणराव कदम साहेब आमसभेस तालुक्यातील सर्व खातेप्रमुखा समवेत शासकीय कामकाजाशी संबंधित लोकांचे प्रश्न,कामे समजून घेत आणि आमसभेतच संबंधित कामे पूर्ण करण्याच्या सुचना देताना जनतेने पाहिले आहे. शिवाय बेफिकीर, आडमुठ्या अधिकाऱ्यांना जाग्यावर समज दिल्याचे अनुभवले आहे आमसभेस वेळेचे बंधन नसे सर्व प्रश्नांचा निपटरा झाल्यावर आमसभा संपत असल्याचे अनुभवले आहे.
आमसभेतील चर्चेतून लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिक यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात मात्र हे प्रयत्न आज दिसत नाहीत. निवडून गेल्यानंतर लोकप्रतिनिधी सामान्य नागरिकांना संपर्कात रहात नाहीत यामाध्यमातून किमान वर्षातून एक वेळ संपर्क साधला जातो. गावोगावचे सरपंच, सामान्य जनता सभेत आपल्या भागाच्या अडीअडचणी मांडण्याचे प्रयत्न करतात. यासाठी तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनी त्वरित आमसभा घ्यावी असे आवाहन पै. बजरंग गावडे यांनी केले आहे.



















