स्वभावातील साधेपणा, नम्रता, निगर्वी वृत्ती आणि सहकार्याची भावना ही त्यांची खरी ओळख आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता मदतीसाठी सदैव तत्पर असलेले सुभाषराव भांबुरे अनेकांसाठी मार्गदर्शक आणि आधारस्तंभ ठरले आहेत
फलटण | सचिन मोरे
कष्ट, प्रामाणिकपणा आणि सातत्य या मूल्यांवर आपले संपूर्ण आयुष्य उभारणारे, निर्भीड पत्रकारिता आणि सेवाभावी वृत्तीचा आदर्श जपणारे ज्येष्ठ पत्रकार श्री. सुभाषराव भांबुरे यांचा उद्या शुक्रवार, दि. १० जानेवारी रोजी वाढदिवस साजरा होत आहे. पत्रकारिता, व्यवसाय आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांत समान ताकदीने कार्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून सुभाषराव भांबुरे यांची ओळख आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ जिल्हा वृत्तपत्रांमधून कार्यरत राहून त्यांनी सत्य, निर्भीडता आणि जनहित यांना सर्वोच्च स्थान दिले. त्यांच्या लेखणीमुळे अनेक दुर्लक्षित प्रश्न प्रकाशझोतात आले. प्रशासनातील त्रुटी असोत किंवा सर्वसामान्यांच्या अन्यायाच्या व्यथा सुभाषराव भांबुरे यांनी नेहमीच निर्भयपणे मांडणी केली. या काळात शेकडो नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांच्या पत्रकारितेमुळे घडून आले.
पत्रकारितेसोबतच उद्यमशीलतेचा आदर्श ठेवत त्यांनी श्रीहरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स, साप्ताहिक ‘सुभाषित’ आणि श्रीहरी ड्रेपरी या उपक्रमांद्वारे प्रामाणिक व्यवसायाची वेगळी ओळख निर्माण केली. विशेषतः श्रीहरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो पर्यटकांना देशभ्रमणाचा आनंद देत विश्वासार्ह सेवेचा ठसा उमटवला आहे.
समाजसेवेचा व्रतभाव हा त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. नामदेव समाजोन्नती परिषद, पालखी सोहळा पत्रकार संघ, फलटण शहर व तालुका पत्रकार संघ, शिवसंदेशकार कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर पत्रकार भवन, भागवत धर्मप्रसारक मंडळ अशा विविध सेवाभावी संस्थांच्या कार्यातून समाजातील विविध घटकांसाठी ते सातत्याने झटत आले आहेत. सामाजिक सलोखा, पत्रकारांचे प्रश्न, सांस्कृतिक जतन आणि धार्मिक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे.
स्वभावातील साधेपणा, नम्रता, निगर्वी वृत्ती आणि सहकार्याची भावना ही त्यांची खरी ओळख आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता मदतीसाठी सदैव तत्पर असलेले सुभाषराव भांबुरे अनेकांसाठी मार्गदर्शक आणि आधारस्तंभ ठरले आहेत.











