फलटण प्रतिनिधी :
फलटणमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष तसेच माजी नगरसेवक मिलिंद नेवसे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षात वाढता प्रभाव आणि आगामी नगरपरिषद निवडणूक लक्षात घेता हा प्रवेश अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.
या प्रवेशावेळी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नेवसे यांनी अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षाचा झेंडा स्वीकारला. आ.सचिन पाटील, प्रल्हाद साळुंखे पाटील, समशेरसिंह नाईक निंबाळकर, शिवरूपराजे खर्डेकर, माजी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, जाधववाडीचे नेते मुनीष जाधव विकास उर्फ बापूराव शिंदे, आदी उपस्थित होते.
मिलिंद नेवसे म्हणाले… “फलटणच्या विकासासाठी निर्णायक नेतृत्वाची गरज होती. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. माझ्यावर कोणताही दबाव नव्हता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला देशाचा विकास माजी खासदार रणजितसिंह यांचे तालुक्याची विकास कामे यामुळेच आपण भाजपा कडे झुकलो. अनेक व्यापारी, डॉकटर, वकील सुद्धा आहेत. शहराच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प करतो,” असे प्रवेशावेळी नेवसे यांनी सांगितले.
माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “फलटणमध्ये विकासाची नवी दिशा देण्यासाठी अनुभवी आणि कार्यक्षम नेतृत्वाची आवश्यकता आहे. मिलिंद नेवसे यांचा भाजपमध्ये प्रवेश हा फलटणसाठी ताकदीचा निर्णय आहे,” अशी प्रतिक्रिया माजी खासदारांनी दिली.
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा ठरू शकतो. नेवसे यांच्या मजबूत नेटवर्कमुळे भाजपाला शहरात अधिक बळकटी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.











