फलटण प्रतिनिधी:- नीरा उजवा कालवा अस्तरीकरणाला होत असलेला विरोध अधिक तीव्र होत असून मंगळवार दिनांक १८ रोजी फलटण येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर हजारोंच्या संख्येने ट्रॅक्टर व बैलगाडी मधून विराट मोर्चा काढणाचा निर्धार नीरा उजवा कालवा संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आला आहे.
फलटण तालुक्यातील सुमारे २० गावातील ग्रामस्थांचा व परिसरातील हजारो शेतकऱ्यांचा निरा उजवा कालवा अस्तरीकरणाला विरोध असून खामगाव तालुका फलटण येथील गुरुदत्त मंगल कार्यालय येथे संघर्ष समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या दिनांक १८ रोजी फलटण येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर हजारोंच्या संख्येने ट्रॅक्टर व बैलगाडी मधून विराट मोर्चा काढणाचा निर्धार नीरा उजवा कालवा संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आला. यावेळी फलटण तालुक्यातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. फलटण तालुक्यात जलसंपदा विभागाकडून नीरा उजवा कालवा अस्तरीकरणाचे काम मागील काही दिवसांपासून सुरू करण्यात आले असून पहिल्या टप्प्यामध्ये रावडी ते तडवळे बंगला हा ४ कि मी अंतराच्या अस्तरीकरणाचे काम सध्या या ठिकाणी सुरू आहे.
मात्र याविरोधात फलटण तालुक्यातील सुमारे २० ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभा घेऊन या अस्तरीकरणाला विरोध दर्शवला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, सिंचनभवन चे कार्यकारी अभियंता, सातारा जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख,फलटणचे प्रांताधिकारी, तहसीलदार, फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक, फलटण शहरचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात येणार आहेत मात्र तरीसुद्धा अस्तरीकरणाचे काम थांबले नाहीत तर भविष्यात होऊ घातलेल्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आला असून त्या अनुषंगाने प्रत्येक ग्रामसभेमध्ये ठराव करणार असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.
यावेळी नीरा उजवा कालवा अस्त्रीकरण विरोधी संघर्ष समितीला राजकारण विरहित आपला जाहीर पाठिंबा असल्याचे महानंदाचे संचालक, जेष्ठ नेते डी के पवार, प्रल्हादराव साळुंखे पाटील, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, राष्ट्रीय समाज पक्ष फलटण, कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर केला.



















