फलटण प्रतिनिधी – फलटण नगर परिषदचे नगराध्यक्ष समशेर दादा नाईक निंबाळकर तसेच उपनगराध्यक्ष सौ. प्रियदर्शनी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. ०४ मार्च २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटी आणि श्री १००८ भगवान महावीर जन्मकल्याणक जयंती महोत्सव कमिटी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांची संयुक्त बैठक पार पडली.
येणाऱ्या डॉ. आंबेडकर जयंती व महावीर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा आणि उत्सवाच्या नियोजनाचा समतोल कसा साधता येईल, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः पालखी मार्गावरील कामे, वाहतुकीची व्यवस्था, मिरवणुकीदरम्यान होणारे संभाव्य अडथळे आणि नागरिकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला.
बैठकीस पीडब्ल्यूडीचे डेप्युटी इंजिनिअर आंबेकर साहेब, ज्युनिअर इंजिनिअर साबळे साहेब, पालखी मार्गाचे प्रोजेक्ट मॅनेजर प्रफुल्ल पाटील, नगरपरिषदेच्या मागासवर्गीय दुर्बल घटक कल्याणकारी समितीच्या सभापती तथा नगरसेविका सौ. सुपर्णा अहिवळे, नगरसेविका मीना काकडे, अमोल सस्ते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटीचे अध्यक्ष हरीश आप्पा काकडे तसेच महावीर जयंती महोत्सव कमिटीचे अध्यक्ष सागर दोशी राजुशेठ वाकडमाने, निलेशशेठ दोशी, पंकजशेठ दोशी उपस्थित होते.
उत्सव काळात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत आणि नागरिकांना सुरक्षित व सुसज्ज वातावरण मिळावे, यासाठी प्रशासन व समित्यांमध्ये समन्वय ठेवून पुढील कार्यवाही करण्याचे ठरविण्यात आले.
फलटण शहरात आगामी जयंती उत्सव शांततेत व उत्साहात पार पडावेत, यासाठी सर्व संबंधित यंत्रणा सज्ज असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.


















