मेंटेनन्सनंतरही समस्या कायम असल्याने महावितरणच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे
फलटण तालुक्यातील जाधववाडी परिसरात आज पहाटेपासून विजेचा अक्षरशः लपंडाव सुरू असून नागरिक प्रचंड संतप्त झाले आहेत. पहाटे साधारण ३ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत तब्बल १० वेळांहून अधिक वेळा वीज पुरवठा खंडित होऊन पुन्हा सुरू होत असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. इतकंच नव्हे तर सध्या देखील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
यापूर्वी मंगळवारी महावितरणकडून “मेंटेनन्स”च्या नावाखाली दिवसभर वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. मात्र एवढा मोठा कालावधी बंद ठेवूनही समस्या सुटली नसल्याचे आजच्या परिस्थितीत स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे “नेमकं मेंटेनन्सच्या नावाखाली काय काम केलं?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
ऐन उन्हाळ्याच्या दिवसात उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना विजेच्या या लपंडावामुळे अधिकच त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी रुग्ण यांची परिस्थिती विशेषतः बिकट झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर तीव्र शब्दांत टीका करत “अधिकारी गेंड्याची कातडी पांघरून बसले आहेत का?” असा संताप व्यक्त केला आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
जर तात्काळ विजेचा सुरळीत पुरवठा सुरू झाला नाही, तर नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मेंटेनन्सनंतरही समस्या कायम असल्याने महावितरणच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.










