फलटण प्रतिनिधी —
भाजपाच्या विकासाभिमुख राजकारणावर विश्वास व्यक्त करत फलटणकरांनी १८ विरुद्ध ९ अशा मोठ्या फरकाने नगरपरिषद भाजप–महायुतीच्या ताब्यात दिली आहे. त्यानिमित्ताने राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी फलटण येथे येऊन नवनिर्वाचित नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा सत्कार केला. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, सौ. मनीषाताई समशेरसिंह नाईक निंबाळकर, कु. ऐश्वर्या समशेरसिंह नाईक निंबाळकर, धनंजय साळुंखे पाटील, जयकुमार शिंदे, सेवानिवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक तसेच भाजप-राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे म्हणाले, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी फलटणमध्ये घेतलेल्या सभेत, “विकासाची जबाबदारी माझ्यावर सोडा, तुम्ही फक्त नगर परिषद भाजप–राष्ट्रवादी युतीच्या ताब्यात द्या,” असे आवाहन केले होते. या निकालातून फलटणकरांना टीका-टिप्पणी व बदनामीचे राजकारण नको असून केवळ विकास हवा आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दिलेल्या वचनाप्रमाणे फलटणच्या विकासासाठी आपण ‘वकिलाची भूमिका’ पार पाडणार असल्याचे प्रतिपादन जयकुमार गोरे यांनी केले.
या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांनी आज फलटणला भेट देत नवनिर्वाचित नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.











