रेडिओच्या जगातील आवाजाचे जादूगार अशी ओळख असणारे ज्येष्ठ रेडिओ निवेदक अमीन सयानी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमीन यांचा मुलगा रझील सयानी यांनी अमीन सयानी यांच्या निधनाची बातमी दिली आहे.
अमीन सयानी यांचे मंगळवारी (20 फेब्रुवारी) सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अमीन सयानी यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्या कुटुंबात आणि मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे.अमीन सयानी यांच्या पार्थिवावर उद्या (22 फेब्रुवारी) अंत्यसंस्कार होणार आहेत.आज त्यांचे काही नातेवाईक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत येणार आहेत.
अमीन सयानी यांचा जन्म 21 डिसेंबर 1932 रोजी मुंबईत झाला. अमीन सयानी यांनी रेडिओच्या जगात विशेष स्थान निर्माण केले. त्यांच्या आवाजाची जादू लोकांच्या मनात घर करून गेली. अमीन सयानी यांनी आपल्या कारकिर्दीला ऑल इंडिया रेडिओ, मुंबई येथून रेडिओ प्रेजेंटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. अमीन सयानी यांनी 54,000 हून अधिक रेडिओ कार्यक्रम केले आहेत. त्यांनी जवळपास 19,000 जिंगल्सना आवाज दिला आहे.