फलटण, प्रतिनिधी –
फलटण येथील न्यायालयाच्या आवारात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा शिलालेख बसविण्यात यावा, अशी मागणी फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. श्री. नितीन आर. बोरकर यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर हरिश हणमंत काकडे,आदर्श विरसिंह अहिवळे, शशीकांत अहिवळे, संघराज अहिवळे,अनिकेत अहिवळे, सुजल गायकवाड, संघकारा अहिवळे, सहिल अहिवळे, राज घोडके, संघर्ष अहिवळे, संविधान काकडे, निसर्ग सावंत, प्रणव काकडे, अमर अहिवळे, प्रेम अहिवळे, स्वप्नील काकडे यांच्या सह्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, भारतीय संविधान हे देशाच्या शासन व्यवस्थेचे मूलभूत तत्त्वज्ञान आणि मार्गदर्शक तत्वे प्रदान करते. संविधानामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा समावेश असून हीच लोकशाहीची खरी ओळख आहे. या मूल्यांची जाणीव सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी व न्यायालयात येणाऱ्या नागरिकांना व्हावी, यासाठी न्यायालयाच्या आवारात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविणे आवश्यक आहे.












