फलटण प्रतिनिधी -
जयपूर येथील केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चरल मार्केटिंग (NIAM) या प्रतिष्ठित संस्थेचा पदवीदान समारंभ नुकताच उत्साहात पार पडला याप्रसंगी अनिकेत संजय शिंदे रा.वाठार निंबाळकर ता.फलटण यांना 'एमबीए इन ॲग्रिकल्चरल बिझनेस मॅनेजमेंट' (MBA-ABM) ही पदवी प्रदान करण्यात आली.
भारताचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि राजस्थानचे कृषी मंत्री माननीय भागीरथ चौधरी यांच्या शुभहस्ते अनिकेतला ही पदवी देऊन गौरविण्यात आले. देशाच्या कृषी धोरणात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते झालेला हा सत्कार अनिकेतच्या कष्टाचे आणि जिद्दीचे फळ मानले जात आहे. या यशामुळे त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, कृषी व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रात एक आश्वासक कारकीर्द घडवण्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे.










