सातारा, दि. 21, (जि.मा.का.) – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सध्या सातारा जिल्ह्यातून मार्गस्थ होत आहे. या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांना आरोग्याचा कोणताही त्रास होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने नियोजन केले असून या अंतर्गत आतापर्यंत 21 हजार 961 वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोग्य वारीचे काम सुरू आहे. वारकऱ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून ओ.आर.एसचा पुरवठा करण्यात येत आहे. आरोग्य विभागामार्फत देण्यात येत असलेल्या सेवांचा वारकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी यांनी केले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान मोहिते, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनिल चव्हाण, खंडाळ्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश पाटील, फलटणचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जगदाळे व जिल्हा परिषद सातारा यांच्या मार्फत वारकऱ्यांना आरोग्य सुविधा पुरवण्यात येत आहेत.
वारकऱ्यांना सुविधा पुरवण्यासाठी पुढीलप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावरील पाणी शुद्धीकरण पथके – खंडाळा तालुक्यात 5 आमि फलटण तालुक्यात 29 असे एकूण 34 पथके तैनात करण्यात आली आहेत. टँकर फिलींगसाठी खंडाळा तालुक्यात 14 आणि फलटण तालुक्यात 21 अशी एकूण 35 पथके, संपूर्ण पालखी मार्गावर 17 आरोग्य दूत पथके, तसेच खंडाळा तालुक्यात 8 व फलटण तालुक्यात 14 अशी एकूण 22 वैद्यकिय पथके तैनात करण्यात आली आहेत.
पालखी मार्गावरील आरोग्य व्यवस्थापनांतर्गत एकूण 163 वैद्यकीय संस्था, त्यामध्ये 12 शासकीय व 151 खासगी संस्थांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये आंतरुग्ण (खाटांची संख्या) शासकीय संस्थांमध्ये 140 आणि खासगी संस्थांमध्ये 900 असे एकूण 1 हजार 40. तसेच प्राथमिक शाळांमध्ये 61 व समाज मंदिरांमध्ये 11 अशी एकूण 72 विविक्षत कक्ष उभारण्यात आले आहेत.


















